काही मिळवण्याच्या प्रयत्नात जीवन जगताना अशी वेळ जीवनात बऱ्याच वेळा आली की, खूप प्रयत्न करूनही ज्या गोष्टीच्या मागे मी वेड्यासारखा धावत होतो, ती गोष्ट मला मिळतच नव्हती.
अशा त्या प्रत्येक वेळी मन खूप खिन्न व्हायचं — असं का होत आहे? किंवा कुठे मी चुकतोय? — ह्याबद्दल काहीच समजायचं नाही.
अशाच त्या परिस्थितीत, एका वेळी माझ्या आतूनच एक आवाज मला ऐकू आला. तो म्हणत होता —
“तुझा जन्म काही मिळवण्यासाठी नाही झाला.
तुला ह्या आयुष्यात काहीही मिळणार नाही, ज्ञान व अनुभव सोडून.
तुझा जन्म काही देण्यासाठी झाला आहे.
तर, तू शोध — असं काय आहे तुझ्यामध्ये, जे तू इतरांना देऊ शकशील;
आणि विचार कर, की ते तू इतरांना कशाप्रकारे देऊ शकशील...”
हा वरील आवाज ऐकल्यानंतर मन थोडं शांत झालं आणि लगेच ह्या गोष्टीचं भान आलं की —
“मन जर शांत असेल, तर ह्या जिवाला आणखी काही लागत नाही.”
“शांत मन हेच मुक्तीचा मार्ग शोधू शकतं.”
जर त्या आवाजाप्रमाणे,
जर मी (किंवा इतर कोणीही) काही देण्याच्या हेतूने आयुष्यभर संघर्ष करत राहीला, तर काही गमवण्याच्या दुखापासून मी नेहमी दूर राहू शकेन.
आणि जर गमवण्याची भीतीच नसेल, तर पुढील प्रत्येक प्रयत्न मी चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे करू शकेन.
मन तर शांतच असेल, जेणेकरून इतर कुठल्याही गोष्टीची गरज भासणार नाही.
अपेक्षाच नसेल, तर अपेक्षा-भंगानंतरचा त्रास तर कोठून होणार!
आयुष्य हे देण्यासाठी की मिळवण्यासाठी — ह्या प्रश्नाचं उत्तर तर गवसले.
— गणेश नरवणे
No comments:
Post a Comment